सांगली : थकीत एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी गुरुवारीपासून निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे. व्यापारी गुरुवारी शहरात बंद पाळणार आहेत. तसेच मोटारसायकल रॅली काढून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.राज्य शासन व महापालिकेकडून ठोस हमी मिळाल्याविना आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्यक्त केला आहे. शनिवारपर्यंत निर्णय न झाल्यास व्यापार बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महापालिकेने चार हजार व्यापाऱ्यांना असेसमेंट पूर्ण करण्यासाठी नोटिसा बजाविल्या आहेत. अभय योजनेतील व्यापाऱ्यांची तपासणी होणार नाही, असा शब्द सत्ताधारी गटाचे नेते मदनभाऊ पाटील यांनी दिला होता; पण आता व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविरोधातील आंदोलनात व्यापारी एकता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सांगली चेंबर, वसंतदादा, गोविंदराव मराठे व मिरज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक सहभागी होणार आहेत. आंदोलनाला जिल्हा सुधार समितीसह स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना, मनसेने पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत व्यापाऱ्यांचा आज बंद
By admin | Published: February 16, 2017 4:35 AM