मुंबई : बाष्प व धुलीकण मिसळल्यामुळे गुरुवारी मुंबईवर धुरके पसरल्याचे दिसून आले. उपनगरासह शहरावर पसरलेले दाट धुरके असल्याने भल्या पहाटे रस्त्यांवर उतरलेल्या वाहनांना वाहतुकीत अडथळे येत होते, तर दुपारनंतर मात्र धुरके काहीसे कमी झाले असले, तरी पुढील ४८ तासांसाठी मुंबईत असेच वातावरण राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मागील दोन दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान १६-१७ अंश नोंदविण्यात येत होते. गुरुवारी त्यात दोन अंशाची घट नोंदविण्यात आली. पहाटे पडलेल्या धुरक्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर काही प्रमाणात वाहन चालकांना अडथळे आले. मालाड, वर्सोवा, जुहू, वांद्रे, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, कफपरेड, मरिन लाइन्स, भाऊचा धक्का आणि भायखळा या परिसरावर धुरके पसरले होते. (प्रतिनिधी)समुद्रावरून उष्ण वारे वाहत आहेत, तर शहरातल्या जमिनीवरून वाहणारे वारे थंड आहेत. या वाऱ्याच्या मिश्रणासह धुळीकण आणि बाष्पाचे एकत्रिकरण झाल्याने, गुरुवारी सकाळी मुंबईवर धुरके पसरले होते.- शुभांगी भुते (संचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते)विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २९ जाने ते १ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील हवामान कोरडे राहील.
मुंबईवर धुरक्याचे पांघरूण
By admin | Published: January 29, 2016 2:28 AM