प्रताप नलावडे / बीडभगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने गडावर ‘संघर्षा’चे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संघर्ष टाळण्यासाठी त्यांच्याकडून ‘मध्यममार्ग’ काढला जातो का, या आशेवर भक्त आहेत. दसऱ्याला होणारा गडाचा वर्धापन दिन निर्विघ्नपणे पार पडावा, ही सर्वसामान्य भक्तांकडून अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. संघर्षाचा तो क्षण येऊ नये, अशी प्रार्थना करत असल्याचे अनेक भक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रविवारी दिवसभर दोन्ही बाजूंच्या काही समर्थकांनी सोईस्कर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी पंकजा यांच्या भाषणासंदर्भात नामदेवशास्त्रींना अनेक पर्यायही सुचवले आहेत. त्यांचे कीर्तन झाल्यानंतर त्यांचे भाषण होईल, असा त्यातील एक प्रस्ताव आहे. नामदेवशास्त्री यांनी राजकीय भाषणाला विरोध केला आहे, परंतु त्यांचे भाषण हे राजकीय होणार नसून, सामाजिक असेल आणि त्या केवळ पाचच मिनिटे बोलतील, असाही एक दुसरा पर्याय त्यांनी सुचविला आहे. राजकीय एक शब्दही त्यांनी उच्चारला, तर आम्ही त्यांचे गुन्हेगार असू, परंतु केवळ भाषणाच्या मुद्द्यावरून शास्त्रींनी ताण वाढवू नये, असे केंद्रे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. महाराजांनी ‘बालहट्ट’ सोडून द्यावा, असेही ते म्हणाले. पंकजा यांचे काही समर्थक आणि स्वत: गोविंद केंद्रे हे दोन दिवसांपासून गडाच्या परिसरातील गावात फिरत असून, लोकांचा दसरा मेळाव्यातील भाषणाला विरोध नसल्याचे ते सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला नामदेवशास्त्री यांनी राजकीय भाषणबाजीला या परिसरातील लोकांचाही विरोध असल्याचे सांगितले आहे.
दसरा मेळाव्याला जाण्यासाठीची तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, दसरा मेळाव्याचे स्टिकर असलेली वाहने रविवारी दिवसभर शहरातून फिरताना दिसत होती. गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ लाख भक्त राज्यभरातून गडावर येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंकजा यांचाही अधिकृत शासकीय दौरा आला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता गोपीनाथगडावर जाऊन त्या तेथून हेलिकॉप्टरने थेट भगवानगडावर जाणार आहेत.