पुणे : यावर्षी राज्यात ढगफुटीच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळते आहे. वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास देखील लांबणार आहे. महाराष्ट्रात जागोजागी ढगफुटी म्हणजे ताशी १०० मिलीमीटर दराचा पाऊस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होत आहे. मात्र पावसाच्या प्रमाणात व सध्याच्या ढगफुटीच्या घटनांच्या तुलनेत आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.
प्रा. किरणकुमार जोहरे हे ढगफुटी तज्ज्ञ म्हणून प्रचलित आहे. तसेच त्यांनी ४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यातील पाषाण येथे ढगफुटी होण्याआधी प्रशासनाला कळवून शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. जोहरे यांनी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) येथे बारा वर्षापेक्षा अधिककाळ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
जोहरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे.तसेच सोलापूर, सांगली, सातारा इथे देखील ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्यात देखील ६ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी रात्री या वेळेत विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटी सारखा पाऊस झाला. अहमदनगरमध्ये या महिन्याच्या ३ तारखेला सायंकाळी साडे ५ ते साडे ६ या कालावधीत ढगफुटी झाली व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व शेकडो वाहने वाहून गेली. मराठवाड्यातील जालना जिल्हयात सोमवारी ( दि. ७) सायंकाळी ४ ते ५.३० या अवघ्या दीड तासात ५६ मिलीमीटर असा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रविवारी ( दि.६) दुपारी एक ते चार या वेळात विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटीसारखा पाऊस झाला.
गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज मान्सूनमध्ये दिवसेंदिवस लक्षणीयरित्या बदल होतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे हवामान खात्याने पावसाविषयीचे वर्तवलेले अंदाज देखील बऱ्याचवेळा फोल ठरतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका तसेच गाव पातळीवर पर्जन्यमापक यंत्र बसविल्यामुळे पावसातील बदलांची योग्य नोंद गाव पातळीवर घेतली जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज आहे.
हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्य़ातील गावात पर्जन्यमापक बसविण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा व आपल्या गावातील पाऊस मोजत त्याच्या नोंदी स्वतः ठेवाव्यात असे आवाहन हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. गावात पर्जन्यमापक कसे बनवायचे हे गावकऱ्यांनीच स्वतः शिकून घ्यावे तसेच शाळाकाॅलेजच्या विद्यार्थ्यांना देेखील ते बनविता येतील इतके सोपे आहे.