नागपूर : सातत्याने येत असलेल्या अवकाळीच्या ढगांनी एप्रिल महिन्याचे चटके अन् उष्णता राेखूनच धरली आहे. साेमवारी सकाळपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाळी ढगांचे सावट पसरले हाेते. थांबून-थांबून सरीही बरसल्या. त्यामुळे दिवसाचा पारा अक्षरश: ७ ते १३ अंशांपर्यंत खाली काेसळला व गारवा पसरला.
हवामान विभागाने विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक भागांत १९ ते २४ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला हाेता. पहिला दिवस वगळता इतर दिवशी रात्रीच्या सुमारास किरकाेळ पावसाने हजेरी लावली. साेमवारी चाैथ्या दिवशी ढग अधिक सक्रिय झाले. नागपुरात ३ मिमी, तर गाेंदियात १० मिमी पाऊस नाेंदविला गेला. इतर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण होते.
पारा कुठे, किती अंशांवर? ढगांच्या आच्छादनामुळे सूर्याची किरणे राेखून धरली आणि तापमान खाली घसरले. गाेंदियात पारा १३ अंशांनी घसरून २६.८ अंशांवर पाेहोचला. नागपुरातही कमाल तापमान ७.६ अंशांनी घसरत ३३ अंशांवर आले. वर्धा ६.५, अमरावती ८.४ अंश, अकाेला ५.३ अंशाने खाली घसरत अनुक्रमे ३५.५, ३३ व ३६.९ अंशांवर आले. इतर ठिकाणी १ ते ४ अंशांची घट झाली. तापमान घसरल्याने चटके व उष्णता गायब हाेत वातावरण पूर्णपणे थंड झाले आहे.
२५ पासून जाेर ओसरेलअवकाळी पावसाची ही सक्रियता २४ एप्रिलपर्यंत राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढचे दाेन दिवस विजा व ढगांच्या गर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. २५ एप्रिलपासून पावसाचा जाेर ओसरेल पण पुढच्या २८ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे एप्रिलच्या उन्हापासून पूर्ण सुटका मिळण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात जोरदार बरसलासातारा : जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले, तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे.