परतूर (जि.जालना) : शहरात रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रात्री लागू करण्यात आलेली संचारबंदी सकाळी सातच्या सुमारास उठविण्यात आली. तर, शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेकप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून परतूर पोलीस ठाण्यात ३४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलंगशहा चौकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीत काही कारणावरून दोन गटांत वाद झाला. त्याचवेळी एका गटाने मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. त्यातून तणाव निर्माण झाला. पोलिसांची कुमक पुरेशी नसल्याने दोन्ही परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. यातच जमावाने परिसरातील हॉटेल, मंडप डेकोरेशनची दोन दुकाने तसेच काही वाहनांची तोडफोड करून आग लावण्यात आली. पोलीस स्टेशन चौकातही बाटल्या व दगडांचा मारा करून जमावाने तोडफोड केली. तब्बल दीड ते दोन तासानंतर दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, पोलिसांची कुमक आल्यानंतर परिस्थितीवर पोलिसांना नियंत्रण मिळविले. यामध्ये पोलीस कर्मचारी-अधिकारी, होमगार्ड यांच्यासह सात ते आठजण जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
परतूरमध्ये कडकडीत बंद
By admin | Published: February 21, 2017 4:03 AM