‘एनपीआर’बाबत मित्रपक्षांच्या दबावानंतर मुख्यमंत्री बॅकफूटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:22 AM2020-02-24T01:22:25+5:302020-02-24T06:50:45+5:30
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांकडून दबाव आल्यानंतर एनपीआरच्या मुद्द्यावर बॅकफूटवर
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांकडून दबाव आल्यानंतर एनपीआरच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याचे रविवारी दिसले.
सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील हा कायदा आहे. तसेच एनपीआर ही लोकसंख्या नोंदणीची व्यवस्था आहे व ती आधीदेखील झालेली आहे, असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सीएए आणि एनपीआरचे एकप्रकारे समर्थन केले होते. मात्र रविवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत ठाकरे यांनी एनपीआरमध्ये कुठल्या त्रुटी आहेत हे तपासून बघावे लागेल आणि त्यासाठी जबाबदार मंत्र्यांची एक समिती करू, अशी भूमिका घेतली.