CM Devendra Fadnavis: राज्यातल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेले दोन मोठे भूकंप म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणलं. मात्र सत्तेचा वाटा, मंत्र्यांची सुरक्षा अशा काही कारणांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नाराजीनाट्यावर अनेकदा पडदा टाकला होता. आता एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना ठाणेकरांसोबत काम करण अवघड वाटतं की बारामतीकरांसोबत याचं उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मुंबएआय टेक वीक २०२५ या कार्यक्रमात 'गव्हर्निंग द फ्युचर: एआय अँण्ड पॉलिसी' या विषयावर बोलत होते. यावेळी लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांची मुलाखात घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणेकरांना सांभाळून घेणं अवघड वाटतं की बारातमीकरांना असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रश्न त्यांनाच विचारा असं म्हटलं.
"हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला हवा. मला तर सगळेच चालतात. त्यांना माझ्यासोबत काम करण्याबाबत काय वाटतं हे तेच सांगू शकतात. मी ठाणेकरांसोबतही काम करु शकतो आणि बारामतीच्या लोकांसोबतही काम करु शकतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकांबाबतही भाष्य केलं. "एआय सुद्धा महापालिकेच्या निवडणुका कधी होणार हे सांगू शकत नाही. आपल्या संविधानात सुप्रीम कोर्ट हे एआयपेक्षाही वरच्या स्थानी आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट ठरवेल तेव्हा महापालिका निवडणुका होतील. पण त्या लवकर व्हाव्यात असं आम्हाला वाटतं. स्थानिक पातळीवरील आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही यापासून वंचित ठेवू शकत नाही. येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय घेईल," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.