मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेचा रथ मंगळवारी अमरावतीच्या दिशेने रवाना झाला. महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरिमन पाॅईंट येथील पक्ष कार्यालयातून हिरवा झेंडा दाखवून हा रथ रवाना केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून या महाजनादेश यात्रेला प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकूण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.
महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल.