New Year 2025: नवीन वर्ष सुरू झाले आहे. केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राजकीय वर्तुळातील तसेच देशभरातील अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी देशवासीयांना नववर्ष २०२५ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा वाढवत, पर्यावरण जपत आणि विकासासोबत आधुनिकीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राला अग्रगण्य बनवण्याचे उद्दिष्ट ठेऊन सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या संकल्पांची नववर्षात पूर्तता होईल, अशी मनोकामना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच २०२५ मध्ये पाऊल ठेवताना एकता आणि दृढनिश्चयाने नवीन संधींचे स्वागत करूया. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो. २०२५ या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा, असे सांगत राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धीची पावले उमटावीत
सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिले, सामान्य नागरिकांच्या घरात सुखसमाधान नांदू लागेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. नव्या वर्षात दुप्पट नव्हे, तिप्पट जोमाने महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृध्दीसाठी राज्य सरकार काम करेल. विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान आपण सर्वजण देत राहू. सुखाचे स्मितहास्य किंवा मोकळा श्वास घेणे म्हणजे काय, याचा अर्थच जणू गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केलेल्या विकासकार्याच्या महायज्ञात महाराष्ट्रानेही आपला वाटा उचलला. यापुढेही नवे स्वप्न, नवा उत्साह आणि नवा ध्यास घेऊन आपण सगळेजण नवी सुरुवात करू. समाजातल्या दुर्बल गोरगरीब घटकांना मदत करून त्यांचे जीवन कसं आनंदी होईल, यासाठी आपण निर्धार करूयात. 'विकसित भारत' आणि 'प्रगतिशील महाराष्ट्र' या ध्येयासाठी गेली दोन वर्षे आपण झटलो, आता नव्या वर्षात हा जोर आणखी वाढवूया. किंबहुना, तोच आपला नववर्षाचा संकल्प असला पाहिजे. राज्यातला प्रत्येक नागरिक प्रगतीच्या मार्गावर चालत राहावा, यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. ‘प्रत्येक कुटुंबात सुखशांती’ हेच आपलं लक्ष्य आहे. एकत्र येऊन आपण बलशाली आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण करू, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा देतो. नववर्षाचं स्वागत उत्साहानं मात्र, आरोग्यभान राखत संयमानं करा, असं देखील आवाहन करतो. महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर सुरू असलेली आपली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.