CM Devendra Fadnavis News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडी सुरू असतानाच मनोज जरांगे यांच्या मेहुण्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, तशी नोटीस बजावण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहेत. या कारवाईवरुन आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.
काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते
मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावरील कारवाई संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, कोणाचा साला आहे, कोणाचा नातेवाईक आहे, यावरून कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
मेहुण्याला नोटीस बजावताच मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
मेहुण्याला नोटीस मिळताच मनोज जरांगे पाटील यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा तिखट शब्दांत टीका केली. फडणवीस सांगतात केसेस मागे घेऊ आणि दुसरीकडे नोटिसा पाठवत आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणे घेणे नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवलीतील आंदोलकांना जर नोटीस पाठवणार असणार, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. म्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा. आपण स्पष्ट सांगितले आहे की, तुमचे बाकीचे काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटिसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, उपोषण सोडून १२-१३ दिवस झाले तरी दिलेल्या आश्वासनांतील एकाचीही शासनाने पूर्तता केलेली नाही. उपोषण सोडविताना आश्वासने द्यायची आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, असे शासनाचे सुरू आहे. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार असून, त्याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.