"कोणी नाराज झालं तरी चालेल, मी स्पष्ट सांगितलं होतं..."; कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:13 IST2025-02-24T17:00:22+5:302025-02-24T17:13:13+5:30
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"कोणी नाराज झालं तरी चालेल, मी स्पष्ट सांगितलं होतं..."; कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची रोखठोक भूमिका
CM Devendra Fadnavis on Manikrao Kokate: महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्याने अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्र्यांनी पाठवलेल्या नावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता न दिल्याने काहींनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीदेखील आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधान केलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिकार मुख्यमंत्र्यांचेच असतात असं स्पष्टीकरण दिलं आहे.
पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्तीवरुन नाराजी बोलून दाखवली होती. हे सर्व आता मुख्यमंत्री ठरवतात असं विधान कोकाटे यांनी केलं. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. कोणी नाराज झालं तरी ही मी चुकीच्याना नावांना मान्यता देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
अशा नावांना मी मान्यता देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"माणिकराव कोकाटेंना हे माहिती नसेल की खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवात आणि त्यावर अंतिम निर्णय करतात. हे काय नवीन नाही. मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले होते की, तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून आहेत, ज्यांची नावे चुकीच्या कामात आली आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे १२५ नावे आली असून त्यातील १०९ नावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित नावांना मी मंजुरी दिली नाही. कारण कुठला ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची कुठली तरी चौकशी सुरु आहे किंवा मंत्रालयात त्यांच्याबद्दलचे मत फिक्सर असं आहे. कोणी नाराज झालं तरी ही मी अशा नावांना मान्यता देणार नाही," असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.