CM Devendra Fadnavis on Ranveer Allahbadia Remark: कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आक्षेपार्ह विधान केल्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला चांगलेच फटकारलं. त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अलाहाबादियाला चांगलेच सुनावलं. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया संदर्भात नियमावली तयार करायला हवी असं म्हटलं.
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आई वडिलांविषयी अश्लील विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी या रणवीर अलाहाबादियाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी रणवीर अलाहाबादियाने सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन आणि देशभरातील सर्व गुन्हे एकत्रित करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं अलाहाबादियाला चांगलेच सुनावलं. रणवीर अलाहाबादियाने केलेले विधान ही विकृत मानसिकता आहे. तो जे बोलला आहे, ते ऐकूण आईवडिलांना लाज वाटेल, बहिणींना लाज वाटेल, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा प्रकरणी कारवाई करायला हवी असं म्हटलं.
"अशा संदर्भात नियमावली तयार करणं गरजेचं आहे. मात्र आताची परिस्थिती अशी झालीय की सोशल मीडियाचे पूर्वी भौगोलिक अधिकार क्षेत्र असायचं. त्यामुळे नियम करणं सोपं होतं. पण त्याला आता अधिकार क्षेत्र उरलं नसल्यामुळे त्याची नियमावली करणं कठीण आहे. त्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहोत. शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. पण त्याची देखील सीमा आहे. अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे काही असिमीत नाहीये. दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही. ज्या ठिकाणी अश्लिलता परिसीमेच्या बाहेर जात आहे त्याठिकाणी कारवाई करणं गरजेचं असतं. यासंदर्भात नियमवाली तयार करण्यासाठी चर्चा चालू आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. तुम्ही जे शब्द निवडले आहेत, ते ऐकूण आईवडिलांनाही लाज वाटेल, बहिणींनाही लाज वाटेल. संपूर्ण समाजाला लाज वाटेल. ही विकृत मानसिकता आहे. तुम्ही आणि तुमच्या लोकांनी ती विकृती दाखवली आहे," अशा शब्दात कोर्टाने अलाहाबादियाला झापलं.