"महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते"; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:45 IST2025-04-05T08:35:45+5:302025-04-05T08:45:45+5:30
महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर सरकार लवकरच कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते"; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत
CM Devendra Fadnavis on Waqf Amendment Bill 2025: शुक्रवारी सकाळी संसदेत जोरदार चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर बहुमताने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे. त्यानंतर याचे कायद्यात रुपांतर होईल. दुसरीकडे, महाराष्ट्रात मोठा वक्फ जमीन घोटाळा झाला असून यासंदर्भात आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
गुरुवारी लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमताने वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. एआयएमआयएम आणि काँग्रेसच्या खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असल्याचे म्हणत सभागृहातील हा लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या विधेयकाविरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनही करत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातल्या वक्फ घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार असल्याचे द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर
२००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार लवकरच कारवाई करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. वक्फचे दुरुस्ती विधेयक लोकशाहीवादी, समाजवादी प्रजासत्ताक भारताच्या घटनात्मक भावनेशी सुसंगत असून समाजाच्या फायद्यासाठी हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जर मालमत्ता अल्लाहच्या नावावर असेल तर ती पारदर्शक असली पाहिजे आणि ती लोकांच्या हितासाठी वापरली जावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"संपूर्ण वक्फची जमीन काँग्रेसने बळकावली आहे. २००० ते २०१४ या काळात मोठा घोटाळा झाला. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची त्यात नावे होती. मी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ही जमीन या नेत्यांनी बळकावल्याचा अहवाल दिला होता. आता या प्रकरणी आम्ही कारवाई करणार आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या नावांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नावे आठवत नाहीत, परंतु अनेक प्रमुख नेत्यांची नावे होती, असं म्हटलं.