राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळ असलेला वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची संकेत मिळत आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे, ज्यात वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरच आता फडणवीसांनी भूमिका मांडली.
अण्णा हजारे यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की, नैतिकतेच्या आधारावर या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत. जर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत, तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्यांना आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
आम्ही त्यांचे राजीनामे मागवू -फडणवीस
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "हे बघा असं आहे की, अण्णा हजारे यांचा आम्ही सन्मानच करतो. अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये... राजीनामा द्यावा की नाही द्यावा... असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्यासंदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे. त्या चर्चेअंतीच मी जी वस्तुस्थिती मांडली आहे."
याच मुद्द्यावर भूमिका मांडताना फडणवीसांनी म्हणाले की, "कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे, असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागवू."