मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी अजूनही रस्सीखेच सुरू असली, तरी बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आकस्मिक निधीतून 5, 380 कोटींची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, याआधी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली होती.
राज्यपालांनी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत जाहीर केली होती. तर दोन हेक्टरपर्यंतच्या फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. याबाबत राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले होते. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी जाहीर केला होता.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.