मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महाराष्ट्राचे कारभारी बदलणार की महायुती सत्ता राखणार या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (१९ ऑक्टोबर) संपला. त्यानंतर सोमवारी (२१ ऑक्टोबर) राज्यात मतदान पार पाडलं. उद्या मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तराखंडमधल्या केदारनाथाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'आज सकाळी केदारनाथाचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले. हर हर महादेव!', असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी पत्नी अमृतादेखील त्यांच्यासोबत होत्या.
मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:09 PM