'महाराष्ट्र अन् मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून असल्यानं...'; एकनाथ शिंदेंचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:28 PM2023-12-13T13:28:34+5:302023-12-13T13:51:01+5:30
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आज डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आज डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक राजकीय दिग्गज मंचावर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, चिमणीमधून निवडून आलेले आमदार नरेंद्र सिंह तोमर, भाजपचे राज्याचे आमदार प्रल्हाद पटेल, माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा उपस्थित होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मोहन यादव यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, मध्य प्रदेश राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हेदेखील उपस्थित होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने एकमेकांच्या साथीने दोन्ही राज्यांचा विकास करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
#मध्य_प्रदेश राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हेदेखील उपस्थित होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 13, 2023
मध्य प्रदेश आणि… pic.twitter.com/SK6vjcMPUv
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.