लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस दिल्लीत जात असले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी किंवा सोमवारी असल्याची चर्चा आहे.
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ दिल्लीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज सायंकाळी चार वाजता दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. स्नेहभोजन समारंभ सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस भाजप श्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.
शिंदे-फडणवीस सरकारचा ३० जून रोजी शपथविधी झाला. शपथविधी होऊन आता २२ दिवस उलटले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी हे यामागचे मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र, दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याने जनतेसह समाजमाध्यमातून टीका होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळ विस्तार तातडीने करण्याचा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस आपल्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील.