Ganesh idol seized viral post : कर्नाटक सरकारने मिरवणूक रोखत गणेश मूर्ती ताब्यात घेतल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. यावर आता नाना पटोलेंनी दोन्ही नेत्यांवर पलटवार केला.
कर्नाटकातील मांड्या येथे गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी हिंसा घडली. या प्रकरणात पोलिसांनी ५२ लोकांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण तापलेले असताना सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात गणेश मूर्ती पोलीस घेऊन जातात आणि गाडीत ठेवतात.
गणपती मिरवणूक रोखली, गणेश मूर्ती जप्त केल्याचे दावे
हे फोटो पोस्ट करत काही जणांनी कर्नाटक सरकारने गणपती मिरवणूक रोखली आणि गणेश मूर्ती जप्त केली, अशा आशयाच्या पोस्ट लिहिल्या आहेत. फोटोमध्ये पोलीस गणेश मूर्ती पोलिसांच्या वाहनात ठेवताना दिसत आहेत. हेच फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केले आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले?
"हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी गणपती मिरवणूक रोखली आणि गणेश मूर्ती जप्त केली. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता काँग्रेस सरकारला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर "जुलूमशाहीचा कळस झाला. महाराष्ट्रातील जनता हे दृश्य कधीच विसरणार नाही. कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
नाना पटोलेंचे शिंदे- फडणवीसांना उत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. "राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत", असे नाना पटोले म्हणाले.
"भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अगोदर राहुलजी गांधी यांच्याबद्दल स्वतःच फेक न्यूज पसरवून आंदोलन करत होते. आता कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती देऊन फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यातील सुज्ञ जनता यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला यांचा खरा चेहरा माहित आहे", अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याचबरोबर फॅक्ट चेक बातमीचा हवालाही दिला.
कर्नाटकात पोलिसांनी खरच गणपती मिरवणूक थांबवली का?
आजतक वृत्तवाहिनीने याबद्दल 'फॅक्ट चेक' केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली की, व्हायरल होत असलेले फोटो एका आंदोलनावेळचे आहे. लोक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करायला आलेले होते. पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले आणि आंदोलकांकडील गणेश मूर्ती पोलिसांच्या गाडीत ठेवली.
13 सप्टेंबर रोजी मांड्यामध्ये झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ काही लोक आंदोलन करत होते. ते बंगळुरूतील टाऊन हॉल येथे आले होते. एका व्यक्तीने गणेश मूर्ती सोबत आणली होती. परनगीशिवाय आंदोलन करण्यासाठी आलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना मोठ्या व्हॅनमध्ये बसवण्यात आले, तर त्यांच्याकडील मूर्ती स्वतःच्या गाडीत ठेवली होती. त्यामुळे गणपती मिरवणूक रोखली आणि मूर्ती जप्त केल्याच्या पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.