Swapnil Kusale 1 crore prize, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राने मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेसाठी अनेक मातब्बर खेळाडू मैदानात होते. त्यातून स्वप्नीलने तिसरा क्रमांक पटकावला आणि भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. भारताला तिसरे पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्यास्वप्नील कुसाळेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलला राज्य सरकारकडून १ कोटीचे बक्षिस जाहीर केले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांनीही स्वप्नीलच्या प्रशिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचेही अभिनंदन केले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली..! पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांशी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसाळे कुटूंबियांचे अभिनंदन केले. स्वप्नीलने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलच्या नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. कुसाळे कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे सर्व गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचे असल्याचे सांगून या सर्वांचे अभिनंदन केले.
अजित पवार म्हणाले...
पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या स्वप्निलच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं अजित पवार म्हणाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नाव उंचावल्याबद्दल स्वप्निल कुसळे याचं मन:पूर्वक अभिनंदन, असेही अजित पवार म्हणाले.
असा रंगला सामना
फायनलमध्ये सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्यपदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक १-१ खेळाडू बाहेर होत गेला. अखेर भारताच्या स्वप्नीलने कांस्यपदकाची कमाई केली.