Mihir Shah, Worli Mumbai Hit and Run Case, Rs 10 Lakh aid to Kaveri Nakhwa: पुण्यातील पोर्शे कारचे हिट अँड रन प्रकरण अजूनही ताजे असतानाच, रविवारी पहाटे मुंबईतील वरळी भागात असाच एक दुर्दैवी प्रकार घडला. २४ वर्षीय मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही, पण मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली आहे अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
मुख्य आरोपी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तब्बल ६० तासांनंतर मंगळवारी शाहपूरमधून अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला. अखेर मंगळवारी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी आपणच कार चालवत असल्याचे त्याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज न्यायालयाने मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
आरोपीचे वडील राजेश शाह शिंदे गटातून पदमुक्त
हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत होते. पण सुमारे ६० तासांनी त्याला अटक करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर आरोपीचे वडील आणि शिंदे गटाचे पालघरचे उपनेते असलेले राजेश शाह यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना पदमुक्त करत त्यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'कोण कितीही मोठा असला तरीही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. अपघातानंतर पहिल्याच दिवशीपासून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून कारवाईत कुठलीही हयगय होणार नाही,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.