लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य सणांवर आलेले निर्बंध यंदा हटविण्यात येत असल्याचे तसेच गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने उठविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. गणरायांचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका देखील जल्लोषात काढता येतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे दोन वर्षांनंतर सणसमारंभ, उत्सव आता दणक्यात साजरे होतील.
गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगमन तसेच विसर्जन मिरवणुकांवर देखील कोणतीही बंधने नसणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी एसटीच्या आणखी जादा बसेस सोडण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे.
शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात
गणेशोत्सवापुर्वी रस्त्यांवरील सर्व खडडे बुजविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.