CM Eknath Shinde: मुंबई, ठाणे, उपनगर, पालघर, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुसळधार पाऊस झाला. मुंबईत पाणी तुंबले नाही, पण ठाण्यात मात्र अनेक ठिकाणी पाणी तुंबले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री हसले आणि उत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी मुसळधार पावसामुळे ठाणे पाण्याखाली गेल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना स्मित हास्य करत, पाऊस खूप जोरात पडतोय. सगळी यंत्रणा काम करतेय. फिल्डवर आहेत. जिथे जिथे नुकसान झाले असेल, त्याची दखल सरकार गांभीर्याने घेईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ
विरोधी पक्षाला आता केवळ टीका करण्यावाचून दुसरे काहीच काम उरलेले नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. टीकेला टीकेने उत्तर न देता आणि आमच्या कामाने विरोधकांना उत्तर देऊ. म्हणूनच सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ. आता त्यावर जास्त भाष्य करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
दरम्यान, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा गृहपाठ बंद करण्याविषयी निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असून, याबाबत तज्ज्ञांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे हित कशात आहे, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.