धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत अदानी समूहाच्या बीकेसी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. महत्वाचे म्हणजे, पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता, धारावीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण 'चाहीए खर्चा, निकालो मोर्चा' असे म्हणतो", असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
शिंदे म्हणाले, "धारावीकर ज्या काही नरक यातना भोगत आहेत, त्यातून आपण त्यांना बाहेर काढायला हवे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी न राहता. धारावीचा विकास कसा झाला? धरावीकरांचे जीवन कशा प्रकारे सुसह्य झाले? हे बघण्यासाठी जगातील लोकांनी यायला हवे." एवढेच नाही, तर "तेथे 300 स्क्वेअर फूट एसआरएमध्ये मिळते, आता येथे 350 स्क्वेअर फूड देण्याचा निर्णय झाला आहे," असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदे पुढे म्हणाले, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण म्हणतो, 'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'. कुणी तरी मध्यंतरी माध्यमाला एक स्टेटमेंट दिले होते, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला, एक वर्षापूर्वी तो तेथे मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. यामुळे आपण यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि या धारावी करांचे जे जीवन आहे. ते आज ज्या पद्धतीने जगत आहेत, त्यातून त्यांना बाहेर काढायचे असेल, तर सर्वांनी सकारात्मक भूमी घेणे आवश्यक आहे."
याच बरोबर, "कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता कामा नये. जे काही ट्रान्सफरंट आहे, त्या सर्व बाबी येथे आहेत. सूचना आणि हरकतीला आणखी वेळ आहे. ते न करता. मोर्चा काढून काही तरी दबाव आणायचा, मग काही तरी बोलणी होईल. हे सर्व लोकांना माहीत आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.