मराठा समाज आज ज्या टप्प्यात आहे, तर त्याला कारणीभूत कोण आहे? हे जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून समजतेय. तुम्हाला आरक्षण देता येत नव्हत की देता येत होत? मग काय अडचणी होत्या? अडचणी कायमच्या दूर करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. आमची विनंती आहे की, ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
मी मराठा समाजातील अनेक तरुणांना आवाहन करतो की, आरक्षण मागणीसाठी इतकं टोकाचे पाऊल उचलू नका, असे वडेट्टीवार म्हणाले. पूर्वी लुटारुंची टोळी म्हणणारे भाजपचे लोक आता लुटारुंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. लुटारुंना माल वाटण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कारखान्यांवर आरोप केले, त्याच कारखान्यांना मदत करत आहेत. सत्तेसाठी कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे यावरुन दिसतेय, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
दसरा संपला आणि जाणाऱ्या रावणाने विचारले मला जाळता पण जाळणाऱ्यांपैकी राम कोण? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले तर बरे होईल. ना सरकारमध्ये राम आहे. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राम दिसतोय, ना धर्मात धर्मात तेढ निर्माण करताना राम दिसत नाहीय. स्वतःला राम दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असतील, तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कधीच रावण मानायला सुरुवात केली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केला.
आरक्षणाची मुदत संपली आहे. तेलंगणाच कारण देऊन आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत आरक्षण द्यायला हवे होते. जरांगे पाटील यांना काय शब्द दिला. तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पाळायला हवा होता. सरकार पळवाट काढत आहे, अस आरोप वडेट्टीवार यांनी केला. पंतप्रधान शरद पवार यांच्याबाबत बोलले. त्याचे उत्तर शरद पवार देतीलच. पण देशातील शेतीचे उत्पन्न वाढले, हरित क्रांती ही काही नऊ वर्षांत झाली नाही. या देशातील कृषी क्षेत्राचा विकास, कृषी माल निर्यात काँग्रेसने केली आहे. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला जाणे, हे बुलेट ट्रेन पासून सुरुवात झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे. १२ हजार कारागीर शिफ्ट होणार आहेत. हिरे व्यापार मुंबईची शान, मुंबईचा कणा होती. हा कणा तोडण्याचं काम केंद्र सरकराने केले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी मोदींवर केला.