मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पहाटेच दिल्ली दौरा आटोपून राज्यात परतले आहेत. यानंतर काहीच तासांत संजय राऊतांवर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगली असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती होती. या दौऱ्यानंतर सकाळी राऊतांच्या घरी ईडीने कारवाई करणे, या योगायोगाबाबत चर्चा सुरू झाल्यात. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याचे म्हटले जात आहे. याआधी संजय राऊत यांना दोन वेळा समन्स बजावत चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण देत संजय राऊत ईडीसमोर हजर झाले नव्हते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मोठी कारवाई करायचीय
एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांना मुंबईतील संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत विचारण्यात आले. यावर, इथे विकासकामांची मोठी कारवाई करायचीय, असे उत्तर देत राऊतांवरील प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी टाळल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, ज्या विशेष विमानातून एकनाथ शिंदे औरंगाबादला आले, त्याच विमानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील त्यांच्यासोबत होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.