CM Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांना घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांनी या संदर्भातील क्लोजर रिपोर्ट कोर्टात देखील सादर केला. मात्र आता आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आल्याने याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अण्णा हजारे यांनी व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी संवाद साधला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी हा अण्णा हजारेंना व्हिडीओ कॉल कशासाठी केला याची चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांच्या शिखर बँक घोटाळ्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्यासंदर्भात कोर्टात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली होती. त्यानंतर अण्णा हजारे यांनी याबाबत भाष्य केलं. या प्रकरणात आक्षेप कोणी घेतला हेच आपल्याला माहीत नाही असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. शिखर बँक घोटाळ्याला चौदा वर्षे झाली. त्यामुळे त्याच काय झालं मला काहीही कल्पना नाही. काल माझं नाव समोर आले. माझं नाव बघून मला धक्का बसला. माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. लोकांना माहित असेल तर बोलतील. मला यातलं काही माहितच नाही मग कसं बोलणार, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडीओ कॉलवर दिल्या आहेत. मुख्यम्ंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ देखील एक्स सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. "ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना व्हिडीओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांना सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत त्यांचे आदरपूर्वक अभिष्टचिंतन केले," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
"आपला आशीर्वाद, मार्गदर्शन असेच लाभत राहू द्या. खूप खूप शुभेच्छा. आरोग्य चांगलं राहू द्या. शतायुशी व्हा. सेंच्युरी मारा," अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा हजारेंना दिल्या. यावर समोरुन अण्णा हजारे यांनी निरोगी राहिलं पाहिजे, असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, "निरोगी ठेवणार परमेश्वर तुम्हाला. तुमची लोकांना, समाजाला, राष्ट्राला गरज आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. खूप खूप शुभेच्छा," असे म्हटलं.