मुंबई - लाडकी बहिण योजना, आनंदाचा शिधा यासारख्या गरिबांसाठी असणाऱ्या योजनांविरोधात विरोधक कोर्टात गेले. गोरगरिबांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करताय. कोविडमध्येही तुम्ही खिचडी हिसकावली. मात्र आता तुम्ही गोरगरिब बहिण, भावांचा घास हिरावताय त्याचे उत्तर तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला द्यावे लागेल. त्यामुळे या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा असं मी माझ्या बहिणींना सांगतो असं विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भीक घेऊ नका, विकले जाऊ नका. लाच घेऊ नका हे कुठले शब्द तुम्ही बहिणींसाठी वापरताय? तुम्हाला १५०० रुपयांचे मोल नाही. मात्र सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचे मोल आहे. तिचं कुटुंब चालवायला कसरत करावी लागते. १५०० रुपये ती बहिण घरासाठी खर्च करेल. हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील. अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. माझी प्रत्येक बहिण, कुटुंबातील स्त्री अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे मोफत सिलेंडर योजना, १५०० रुपये दिले आहेत. विरोधकांच्या टीकेला माझ्या बहिणी उत्तर देतील असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मुघलांच्या घोड्यांना जसं संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं उद्धव ठाकरेंना मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय हे त्यांना अजून पचनी पडत नाही. दररोज झोपता, उठता, बसता त्यांना स्वप्नातही मी दिसतो. सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, २ दिवसाने पडेल असं सांगत होते आज सरकारला २ वर्ष होऊन गेली. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी आणलेल्या योजनेचे तुम्ही फॉर्म कसे भरता, बॅनर लावतात. त्यामुळे हे लोक दुटप्पी आहेत. सर्वसामान्य बहिणींची, लाडक्या भावांची या लोकांना काळजी नाही. या लोकांना केवळ घेणं माहिती आहे देणं नाही. आमचं सरकार देणारं आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी जे आरोप केले ती वस्तूस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं हे समजू शकतो परंतु मी तर त्यांच्या सरकारमधील मंत्री होतो. माझ्याबाबतीत अशाप्रकारे प्रयत्न केला गेला. मी स्पष्टपणे योग्य वेळी याबाबत सांगेन. मला गुन्ह्यात अडकवण्याचा, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तूस्थिती आहे. मी योग्य वेळी त्यावर बोलेन असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांना दुजोरा दिला.
"महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू"
सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. त्या बैठकीत संध्याकाळपर्यंत येणार म्हणाले आणि कुणी आले नाही. दुर्दैवाने राज्यात २ समाजात जो संघर्ष सुरू आहे तो थांबला पाहिजे ही माझी आणि सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. मी शरद पवारांना भेटलो तेव्हाही हेच सांगितले. निवडणूक येते जाते, सरकार येतात, जातात पण असं कधीही आपल्या राज्यात पाहायला मिळालं नव्हते. या महाराष्ट्राची जी संस्कृती, परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये. त्यामुळे जे काही समाजासाठी करता येईल, वातावरण शांत करण्यासाठी सर्व प्रयत्न, जे काही करायचे ते आम्ही करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या तोडग्यावर दिलं आहे.