CM Eknath Shinde : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारला रविवारी दोन वर्ष पूर्ण झाली. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली होती.महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्षं पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला.
"प्रत्यक्षात कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केले. महाविकास आघाडीने बंद केलेली कामे मग ती मेट्रोची असो वा रस्त्याची. ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरू केली आहेत. जनतेची इच्छा आहे की आम्ही सत्तेत यावे कारण आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत. सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही खूप काम केले आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे कौतुक केले आणि या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला. "शिवसेना ठाकरे गटाकडे जे साडेचार टक्के मतं राहिले आहेत. लोकसभेला ठाकरे गटाच्या काही जागा कोणामुळे निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसची व्होट बँक त्यांच्याकडे आली. मात्र, काँग्रेसची व्होट बँक तात्पुरती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे. पण सूज जास्त काळ राहत नाही," अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
योग्य वेळी सगळं बोलणार - मु्ख्यमंत्री शिंदे
"ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे. माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा आहे. आणखी कुठे काय काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. पण मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही. यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.
"ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं. उठता, बसता त्यांना खोक्याशिवाय काहीही समजलं नाही याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, त्यांना खोके नाही कंटेनर पाहिजे. खोके ठेवायला कंटेनर लागतो ना? त्यांनी आयुष्यभर फक्त खोके जमा करण्याचं काम केलं आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.