NCP Sharad Pawar, CM Eknath Shinde Fake Signature: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले. त्यानंतर यासंबंधी पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र आता याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर तीव्र आक्षेप घेत सडकून टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांचा धाकच उरलेला नसल्याचा टोलाही लगावला.
"गुंडांना मुख्यमंत्री शिंदे यांची भीती राहिली नाही कारण यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात एक तोतया अधिकारी कार्यरत होता. आता बनावट शिक्के व बनावट सह्यांची नवीन प्रकरणे समोर आली असून जनतेच्या विश्वासाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तोतया अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या एवढी मजल मारणे इतकी हिम्मत काही लोकांची होते याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा धाक अशा लोकांवर राहिला नाही," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.
"बनावट सह्यांचा दुरुपयोग करून कोणा कोणाच्या बदल्या केल्या, कुठले कुठले महत्त्वाचे आदेश काढण्यात आले याची सखोल चौकशीची मागणी आम्ही करत आहोत व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून जारी केलेले सर्व आदेश गोठवावेत," अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.