Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंना राज्यभरातून प्रचंड मोठा पाठिंबा मिळत असून, शिवसेनेतील गळती काही केल्या थांबताना दिसत नाही. मात्र, यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या मदतीला धावल्याचे सांगितले जात आहे. एका शिवसैनिकावर संकट कोसळल्याचे समजताच एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत तातडीने त्याला २ लाख रुपयांची मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.
परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रामाणिक सदस्य चंदू शिंदे यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले आहेत. चंदू शिंदे यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे. ही मदत शिंदे गटाचे कोकण विद्यापीठाचे कार्यकारणी सदस्य प्रवीण देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आलेल्या या मदतीमुळे चंदू शिंदे यांच्या कुटुंबियांना आधार मिळाल्याचे सांगितले जात आहे.
शिवसैनिकावर अचानक संकट कोसळले, शिंदे मदतीला धावले
सामान्य परिस्थितीमध्ये काम करत चंदू शिंदे यांनी आपले जनमत तयार केले. अशा सच्चा शिवसैनिकावर अचानक संकट कोसळले. डोक्यातील एक नस तुटल्याने मेंदूला दुखापत झाली. चंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अशावेळी डॉ. गोविंद रसाळ व मेंदूतज्ञ डॉ. एकनाथ गनाळे यांनी चंदूवर एक शस्त्रक्रिया केली. आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. या दोन शस्त्रक्रियेचा खर्च चंदूच्या कुटूंबाला न झेपणारा होता. या कडवट शिवसैनिकाच्या मदतीला आ. डॉ. राहूल पाटील व काही मित्र परिवार धावून आले. त्यानंतरही चंदूच्या उपचाराचा खर्च हा वाढतच होता. शिंदे समर्थक प्रविण देशमुख यांनी चंदूच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली. नुसती मागणीच नाही केली तर प्रविण देशमुख यांनी आग्रहही केला. चंदू शिंदेला मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून दोन लाखाची मदत देखील पाठविण्यात आली.
दरम्यान, ही मदत हॉस्पिटलला मिळाली असल्याची माहिती डॉ. गोविंद रसाळ यांनी दिली. ही मदत देखील चंदूच्या कुटूंबीयांना आधार बनली आहे. मनपा सदस्यांकडून सह्यांची मोहिम राबवली जात आहे. शेवटच्या महिन्याचे मानधन हे चंदूला देण्याचा निर्णय सर्व मनपा सदस्यांनी घेतला आहे. रुग्णालयातून चंदूला स्वतःच्या घरी हलविण्यात आले असून, प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. एक चांगली शस्त्रक्रिया झाल्याने चंदूचे प्राण वाचले आहेत.