CM Eknath Shinde in Dharashiv : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत. दरम्यान, शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज त्यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
बाळासाहेबांचे विचार विकायला निघालेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकायला निघाले होते, तेव्हा आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं. त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचं भाग्य मला मिळालं. पुर्ण बहुमताचं सरकार आणल्यावर आम्ही उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर नामकरण करुन बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं.'
ठाकरेंची आग लावणारी मशाल'धनुष्यबाण आमचा आहे, असं म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, तर ती घराघरात आणि समाजासमाजात आग लावणारी मशाल आहे. गेल्या अडीच अडीच वर्षांच्या काळातील मविआ आणि महायुतीने केलेली कामं जनतेने बघावी. त्यांनी अडीच वर्ष फक्त कामांना स्टे दिला आणि आम्ही आमच्या कार्यकाळात राज्याचा विकास केला,' अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी केली.
तानाजी सावंतांना पुन्हा मंत्री करणारयावेळी एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांना पुन्हा मंत्री करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, 'परंड्याच्या जनतेच्या मनात काय आहे, हे या गर्दीने दाखवून दिलंय. हा एकनाथ शिंदे 23 तारखेला तुमच्यासोबत परांड्यात फटाखे फोडायला येतोय. तुम्ही तानाजीरावांना पुन्हा आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी,' असा शब्द एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील जाहीर सभेतून दिला. दरम्यान, परांडा येथे तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.