Eknath Shinde Devendra Fadnavis vs Congress: राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सुरात सुर मिसळला आहे. भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केला हे जनता अजून विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर टीका करणाऱ्या विचारधारेच्या लोकांसोबत सत्तेत एकत्र बसलेले एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले, "पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिलेली स्क्रिप्ट वाचू का ? असे विचारून बोलणा-या एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढण्यापूर्वी सावरकरांचे ‘ सहा सोनेरी पाने’ पुस्तक वाचावे. या पुस्तकात सावरकर शिवरायांबद्दल म्हणतात, "काकतालीय नितीप्रमाणे (कावळा बसायला आणि फांदी तुटायला याप्रमाणे) शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती". तसेच छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल 'हिंदुपद पातशाही' या पुस्तकात सावरकर लिहतात की, "मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान नाकर्ता राजपुत्र संभाजी". सावरकरांची छत्रपतींबद्दलची ही विधाने एकनाथ शिंदे यांना मान्य आहेत का? हे त्यांनी यात्रे आधी जाहीर करावे."
"राहुल गांधी यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सांगण्यावरून टीका करणे योग्य नाही. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल जे विधान केले ते वास्तव आहे, त्यात चुकीचे काय ? असा सवाल विचारून लोंढे म्हणाले की, भाजपाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे सन्मानयात्रा कशी काढतात, याची वाट राज्यातील जनता पहात आहे," असेही लोंढे म्हणाले.