Eknath Shinde laughing, Devendra Fadnavis: महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ९ मार्चला आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री म्हणून प्रथमच देवेंद्र फडणवीसांनी यंदा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर गेले दोन दिवस विधानसभेत चर्चा झाली. अर्थसंकल्पात काही गोष्टींची कमी आहे, ज्या गोष्टींची अपेक्षा होती त्या पूर्ण झालेल्या नाहीत, जुन्या सरकारने दिलेल्या गोष्टीच पुन्हा नव्याने मांडण्यात आल्या आहेत, अनेक योजना पैशाचा विचार न करता जाहीर करण्यात आल्या आहेत, असा विविध प्रकारचा सूर विरोधकांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना लावला. यात शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत असताना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस एक असे वाक्य बोलले की बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील खो-खो हसू लागले. इतकेच नव्हे तर संपूर्ण सभागृहात हशा पिकला.
काय म्हणाले फडणवीस?
"शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही खूपच कमी आहे असे विरोधक म्हणत आहेत. वर्षाला मिळणाऱ्या मदतीचे विरोधकांनी गणित मांडून महिन्याला किती आणि दिवसाला किती असेही हिशेब मांडले आहेत. पण मी साऱ्यांना सांगू इच्छितो की, ज्यावेळी अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे जेव्हा शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान होते, तेव्हा त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. त्यावेळी शेतकऱ्याने न खचता पुन्हा उभे राहावे म्हणून तो भिजाई घ्यायला जेव्हा बाजारात जातो त्यावेळी त्याला या ६००० रूपयांच्या मदतीचा उपयोग होईल अशी आमची खात्री आहे. छोट्या गोष्टीनेच सुरूवात करायला हवी. आता जी रक्कम आहे, त्यात भविष्यात कदाचित वाढदेखील करता येईल. सुरुवात महत्त्वाची असते, ती तुम्ही नाही केली. तुमच्या (महाविकास आघाडीच्या) काळात मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे होते, त्यावेळी त्यांनी ही सूचना मांडली होती. पण तुम्ही ती मान्य केली नाहीत. मी बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पटकन ऐकतो..." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या वाक्यावर शेजारीच बसलेले एकनाथ शिंदे अक्षरश: खो-खो हसले. इतकेच नव्हे तर सभागृहातील इतर सदस्यही हसू लागले.
धनंजय मुंडेंच्या शायरीलाही दिलं शायरीतूनच उत्तर
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका करताना शायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं....मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये...", असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनीही शायरीतून उत्तर दिलं. "दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं", असं फडणवीस म्हणाले.