मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईला रवाना झाले असून, बंडखोर आमदार कधीपर्यंत मुंबईत परतणार याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गुवाहाटीवरून गोव्याला गेलेले बंडखोर आमदार शनिवार, २ जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार, २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार तसेच शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार हे भाजप आमदारांसह हॉटेल ताजमध्ये वास्तव्य करणार असल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार?
शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी सूरत गाठले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. यानंतर शिंदे गट गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये उतरला होता. या ठिकाणी शिवसेनेचे ३९ आमदार आणि अपक्षांसह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत होते.
दरम्यान, भाजपने या सत्ता संघर्षात उडीत घेतल्यानंतर राज्यपालांना मविआ सरकारला बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी गुवाहाटीवरून गोव्याला येण्याचा निर्णय घेतला होता. सूरत, गुवाहाटी, गोव्यानंतर आता सर्व बंडखोर मुंबईत दाखल होणार आहेत.