Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केले. मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा आरोप जरांगे यांनी फडणवीसांवर लावला. तसेच काल राज्यभरात करण्यात आलेल्या रास्ता रोकोनंतर अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी रागाच्या भरात फडणवीसांवर आरोप केले आणि मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर यायला निघाले. उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढावी, यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. जरांगे यांनी फडणवीस आणि इतर नेतेमंडळींबाबत ज्याप्रकारे शिवीगाळ भाषा वापरली त्याबाबत खेददेखील व्यक्त केला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 'उपचार देण्याच्या बहाण्याने मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जाणार होता, राज्यात माझ्याविरोधात जी लोकं उभी करण्यात आली ते फडणवीसांनीच केली. फडणवीसांना माझा बळी हवा आहे', असे काही दावे करत जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आरोप केले. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.