मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राहुल कनाल यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्यप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात ठाकरेंचे सरकार पाडले. शिंदेच्या या भूमिकेला पक्षातील ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे-शिंदे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. त्यात निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदेंसोबत आले. त्यात युवासेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे मित्र असलेले राहुल कनाल यांनीही ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत आले होते.
राहुल कनाल हे केवळ राजकीय क्षेत्रात नसून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातही त्यांचा वावर असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी अनेकदा बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी दिसून येते त्यात राहुल कनाल यांचीही भूमिका असते. आता राहुल कनाल यांना शिवसेना सोशल मीडियाचं राज्यप्रमुख बनवण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट सोशल मीडियात फार सक्रीयपणे उतरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना लक्ष्य केले जाते. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल कनाल यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाची सोशल मीडिया टीम प्रचारात उतरणार आहे.
कोण आहे राहुल कनाल?
राहुल कनाल हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. एकेकाळी राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि विद्यमान आमदार मिलिंद नार्वेकर यांचे ते निकटवर्तीय समजले जात हते. तसेच राहुल कनाल आदित्य ठाकरेंच्या युवासेनाच्या कोअर टीमचे सदस्य होते. कनाल यांना पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून घेत त्यांचा शिक्षण समितीतही युवासेनेतून संधी दिली होती तसेच श्री साई बाबा संस्थानचे विश्वस्त पदही त्यांचेकडे होते. एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या जवळचे व मातोश्रीच्या जवळचे असं राहुल कनाल यांना मानलं जायचं त्यामुळे सोशल मीडियांच्या प्रमुखपदी आल्यानंतर राहुल काही मोठे गौप्यस्फोट करणार का? हे पाहावं लागेल.