नंदूरबार - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे गतिमान सरकार आहे. कुठल्याही कामासाठी थांबण्याची गरज नाही. तात्काळ निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती नंदूरबारमधील एका कार्यक्रमात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरूनच शासकीय अधिकाऱ्याला थेट फोन करून नंदूरबारला ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली.
नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हजर होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू होते. तेव्हा त्यांनी नूतन इमारतीसाठी राज्य शासनाकडून येणारा ७ कोटी २८ लाखांचा निधी अद्यापही देण्यात आला नाही. तो लवकरात लवकर देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. तसेच विलासराव देशमुखांच्या कारकिर्दीत ३ दिवसांत १ कोटी निधी दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला.
चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवत तात्काळ नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी रखडलेला निधी वाटप करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर अवघ्या ३ मिनिटांनी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आणि मंचावरूनच ७ कोटी २८ लाखांचा निधी नंदूरबार नगरपालिकेला दिला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अनेकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांनी वाचला कामाचा पाढाराज्यातील हे भाजपा-शिवसेना सरकार काम करणारं आहे. या सरकारने ७२ मोठे निर्णय घेतले. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना केली. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. ३ मिनिटांत स्टेजवरून नगरपालिकेचे ७ कोटी २८ लाख देणारे हे गतिमान सरकार आहे. बंद जल सिंचन प्रकल्पांना चालना दिली यामुळे अनेक हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी ७ कोटी लोकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"