CM Eknath Shinde News: दहा वर्षांत एकही सुट्टी न घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले आहे. दुसरीकडे, राहुल गांधी थोडे गरम झाले की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिथे भारताची बदनामी करतात. आपल्या सरकारकडून राज्यात सगळीकडे चौफेर विकास होत आहे. इथून समृद्धी महामार्ग जातो, याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला सरकारने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. कारण बाळासाहेबांच्या विचारांचे हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार उभे आहे. सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले आहे. शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात सापडेल. तेव्हा तेव्हा आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हा आपल्या सरकारचा दृढ विश्वास आहे. शिर्डी हे मोदी यांचेही श्रद्धेचे ठिकाण आहे. शिर्डीतील खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल. नेवासा, शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून लांब राहिले पाहिजे
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून लांब राहिले पाहिजे. मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता १० टक्के आरक्षण दिले. काहीजण न्यायालयात आरक्षण रद्द करण्यासाठी गेले. मराठा समाजाचा केवळ राजकारण करण्यासाठी वापर केला. परंतु काही विघ्नसंतोषी लोक राज्यात फिरत असून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. ते काही देणारे नाहीत. पण जर तुम्हाला मिळणारे असेल ते हिसकावून घेणारे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसने दलित, मुस्लिमांचा फक्त व्होट बँक म्हणून वापर केला. गरिबांना गरीब ठेवले. काँग्रेसचा गरिबी हटाव नारा होता पण देशातला गरीब हटला, गरिबी हटली नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढले. गरिबांचा उत्कर्ष करणारा नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहिले जाते, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.