मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या समर्थक आमदारांना घेऊन शिंदे पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मध्यावधी निवडणुकांचे वक्तव्य केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे आमदारांसह गुवाहाटीला जाण्याची तयारी करत असल्याचे वृत्त येत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून देखील शिंदे सरकार पडणार असल्याची वक्तव्ये करत आहेत. शिंदे गट गुवाहाटीला जाणार असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. बंडानंतर शिंदे गट आधी सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेला होता. गुवाहाटीला शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार जाऊन त्यांना मिळाले होते. यानंतर शिंदेंनी सत्ता स्थापनेचा दावा करत कामाख्या देवीचे आमदारांसह दर्शन घेतले होते. यावरूनही मोठा वाद झाला होता.
सत्तास्थापनेवेळी शिंदे यांनी आपण पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे म्हटले होते. या दौऱ्याची तयारी आता सुरु झाली आहे. शिंदेंचे काही खास कार्यकर्ते गुवाहाटीला पोहोचले असून दौऱ्याची रुपरेषा ठरवित आहेत. तसेच शिंदे गटाच्या काही आमदारांना देखील जबाबदारी देण्यात येत आहे. हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येत आहे. यामुळे हे आमदार टप्प्या टप्प्याने गुवाहाटीला जाणार आहेत.
शिंदे आणि कामाख्या देवस्थानचे प्रमुख पुजारी यांच्यात देखील चर्चा होत असून पोलीस प्रमुख, सुरक्षा आदींची माहिती घेतली जात असल्याचे समजते. शिंदे देखील लवकरच पोलीस प्रमुखांशी बैठक घेणार आहेत. पुढील आठवड्यात शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे.