CM Eknath Shinde News: नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जनतेने ठरवले आहे की, अब की बार ४०० पार. देशात कोण आहे त्यांच्यासमोर? राहुल गांधी गरम झाले की, परदेशात थंड हवा खायला जातात. परंतु, इथे उन्हाळा, पावसाळा, दिवस-रात्र या देशाची सेवा करणारा पंतप्रधान हा नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळाला आहे. देशाची बदनामी करणाऱ्याला की देशाची उन्नती करणाऱ्याला लोक निवडून देणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, परंपरा आहे. सध्या आरोप केले जात आहेत. टीका होत आहे. महिलांवर अशा प्रकारे कधीच टीका झालेली नव्हती. असे कधीच झाले नव्हते. आता ते होत आहे. या सर्व गोष्टींना जनताच मतपेटीतून उत्तर देईल. त्यांना कामधंदा नाही. कामे आम्ही करत आहोत आरोप ते करत आहेत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकरशिवसेना शिंदे गटात येणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना लोकसभेची ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. याच संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा मिलिंद नार्वेकरांविषयी विचारले तेव्हा ते हसले आणि अजून आमच्या संपर्कात नाही, असे सांगितले.
दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जे बोललो ते सगळे खरे आहे. आणखी बरेच खरे आहे. ते नंतर ब्रेक के बाद येईल. खूप काही आहे. एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो, त्यामागे काही कारणे असतात. जे आहे ते आहे. मी कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही. माझी काही तत्त्वे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आणि दिघे साहेबांच्या शिकवणीत तयार झालो आहे. जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणे हा माझा स्वभाव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.