CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे एक जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात केलेल्या विधानाचा आधार घेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्यासोबत यावे, अशी ऑफरच दिली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केले आहे जे मला वाटते की, त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केले असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटत आहे की, ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे. याचा अर्थ असा की, जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्यामुळे नरेंद्र मोदींनी ऑफर दिली
आता काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचे जे सुरू आहे. एखादा माणूस विलिनीकरण कधी करतो, जेव्हा त्या पक्षाची क्षती होते. पक्षाची ताकद कमी होते. दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले. याचा अर्थ त्यांनी हार मानलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांच्या आपल्या पक्षात कधीही येणे चांगले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नंदुरबारमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र काम करतील. काही तक्रारी आहेत, त्या दूर करण्यात आल्या आहेत. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व चंद्रकांत रघुवंशी यांचात बैठक झाली. सर्व मतभेद दूर करण्यात आले आहे . महायुतीत शिवसेना व भाजपा एकदिलाने काम करत आहे. चंद्रकांत रघुवंशी मोठ्या विश्वासाने महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा प्रचार करतील व नंदुरबार लोकसभा सीट भाजपाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना निवडून आणतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.