एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री बनला, त्याच्या सत्कारासाठी पुणेकर रिक्षाचालकांनी, शिवसेना समर्थकांनी आणि आठवले गटाने जय्यत तयारी केली होती. भर पावसात सायंकाळपासून हे कार्यकर्ते उभे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या साऱ्यांकडून सत्कार, जल्लोष नम्रपणे नाकारला आहे. याचे कारणही महत्वाचे आहे.
एकनाथ शिंदे स्टेजवर आल्यावर त्यांना भला मोठा हार घालण्यात येत होता. बाहेर ढोल ताशे, फटाके वाजविण्यास सुरुवात झाली होती. इतक्यात शिंदे यांनी माईक हातात घेतला. ''सर्वांना माझी नम्र विनंती आहे, कुठेही वाद्ये फटाके वाजवू नका. कारण अमरनाथमध्ये पुण्यातील तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे कुठेही जल्लोष करू नका'', असे भावनिक आवाहन उपस्थित समर्थक, आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना केले.
मी तुम्हाला खास भेटायला आलोय. मी आषाढी एकादशीच्या पुजेला जात आहे, वेळेत पोहोचायचे आहे. सर्वांचे आभार मानतो. अमरनाथ यात्रेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून या मृतांना श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
मी पुन्हा आपल्याला भेटायला येईन. तुम्हा सर्वांच्या आणि राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी मुख्यमंत्री पदाचा वापर जनतेच्या भल्यासाठी, कामासाठी करेन, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. बाळासाहेब, दिघेंचे विचार पुढे नेण्याचे काम करणार आहे, असे शिंदे म्हणाले.
युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य किरण साळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना उपाध्यक्ष विद्यापीठ कक्ष आकाश शिंदे आदी उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र ट्राफिकमध्ये अडकल्याने कार्यक्रमात पोहचू शकले नाहीत.