Maharashtra Politics: सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते; पण सत्ता हातात असलेल्यांची आता विधाने वेगळीच आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार, असे म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू, असा इशारा देत आहेत. मात्र, ही राजकीय नेत्यांची कामे नाहीत, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले. यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना प्रत्युत्तर दिले आहे.
केरळपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढणे सोपी गोष्ट नाही. राहुल गांधी यांनी ते साध्य करून दाखवले. त्यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सत्ताधाऱ्यांकडून टिंगलटवाळी होत असली तरी, यामध्ये गाव खेड्यातील सामान्य माणूसही सहभागी झाला. राहुल गांधी यांच्याविषयी वातावरण दूषित करणाऱ्या भाजपला उत्तर मिळाले, असा टोला लगावताना राज्यपाल हे महत्त्वाचे पद असल्याने त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...
सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याची टीका शरद पवार यांनी शिंदे गट आणि भाजपवर केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. मात्र आम्ही काल पण कार्यकर्ते होते आणि आज ही कार्यकर्ते आहोत. जनतेचे सेवक म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. आमची जमीन आम्हाला माहिती असून, आमचा संपर्क येथील लोकांशी आहे. त्यामुळे नेमके हवेत कोण आहे, हे पवारांनी जरूर तपासावे. तसेच सीमावादाबाबत राज्य सरकार गंभीर आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी सरकारने संपर्क केला असून, ते सरकारच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"