मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असून, यात कोण बाजी मारणार, याकडे आता नजरा लागल्या आहेत. यातच शिवडी येथील शाखा उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे.
शिंदे गटाने केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्ष, संघटना पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीय झाले असून, निष्ठा यात्रेनंतर राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. तसेच उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांना संबोधित करताना भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेसंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.