Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षात भर पडली आहे. यातच ठाकरे गटाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढला होता. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत शिंदे गटावर सडकून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
"मी ठाण्यातून लढण्यास तयार, सत्तेत आल्यास विराेधक तुरुंगात"
ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढायला मी तयार आहे. मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. पुन्हा आमचे सरकार आल्यावर विरोधकांना जेलभरो यात्रा घडविण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवले
शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून घरावर तुळशीपत्र ठेवले. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार, असा टोला लगावत, लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.
दरम्यान, राज्यातील सरकारला ‘चले जाव’ करायची वेळ आली आहे. हमारा नामोनिशाण मिटाने चले हो, माझे नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे सामने आओ हम तुम्हारा नाम भुला देंगे, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा. मात्र, पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे विसरू नका. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना ‘जेलभरो यात्रा’ घडविली नाही तर बघा, असा इशारा आदित्य यांनी दिला. आम्ही आता ‘मविआ’ची वज्रमूठ केली आहे. ठाणेकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"