Winter Session Maharashtra 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले.
धारावी पुनर्विकासावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. तसेच मराठा आरक्षण, दिशा सालियान मृत्यूप्रकरणी लावलेली एसआयटी चौकशी या मुद्द्यांवरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावर, आपल्याला सातत्याने विचारणारे कुणीतरी आहे असे लक्षात आले की यंत्रणा काम करते. कलेक्टरही कामाला लागले आहेत. विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवे. मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सातत्याने दौऱ्यावर असतात, असेही कुणीतरी म्हणाले. पण पोराटोरांना योग्य वयात समजावून सांगितले की त्यांना समज येते. लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेले चांगले असते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.
कोरोना काळात मतदारसंघात गेले नाहीत, त्यांनी हे सांगू नये
कोरोना काळात आपल्या मतदार संघात गेले नाहीत त्यांनी हे सांगू नये. नाईलाजाने हे सांगावे लागते आहे. कारण तसे आरोप होत आहेत, त्यामुळे बोलवे लागते. आम्ही घरात बसून व्हीसी घेऊन सूचना करत बसलो नाही. पाऊस आला, संकट आले तेव्हा आम्ही फिल्डवर गेलो घरात बसून राहिलो नाही. २०१९ पासून जे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षेत सत्तेत होते. त्यांनी आरोप करताना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मागच्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीत आम्ही अधिक पटीने मदत आम्ही दिली आहे. आधीच्या सरकारप्रमाणे फक्त घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला आम्ही पाने पुसलेली नाहीत. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून व्हीसीद्वारे बैठका घेतल्या नाहीत. इतरांना सूचना देत बसलो नाही, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान, शेतकरी अडचणीत असताना कधीही घरात बसून राहिलेलो नाही. बांधावर गेलो. शेतावर गेलो आहोत. समजून घेतले आहे. अधिवेशन काळातही मदत केली. आमचे सरकार हे शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.