Bypoll Election 2023: आताच्या घडीला संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हायला हवी आहे. मात्र, महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे म्हटले आहे भाजपच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून संपर्क साधला. यावर बोलताना, परंपरा जपण्याची विनंती केली आहे. विनंती करणे आमचे काम आहे. पण निर्णय घ्यायचे काम त्यांचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोटनिवडणुकीत नेमका काय निर्णय घ्यायचा आहे ते आता त्यांनी ठरवले पाहिजे. पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी शरद पवार, अजित पवार, आणि राज ठाकरे यांच्यासह नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
परंपरा जपण्याची विनंती करणे आमचे काम
आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही एखाद्या मतदार संघातील आमदार सदस्यांचे निधन झाले, तर विभागात उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करण्याची आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध करावी. नेत्यांना विनंतीचा फोन करणे हा आमचा अधिकार आहे. तर त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा हा अधिकार त्या त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"