Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. बंडाची लढाई अजिबात छोटी नव्हती. थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
आम्ही बंड केले. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एकीकडे सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असे वाटत होते. दगा फटक्याचा धोका होता. अशावेळी थोडे जरी इकडे तिकडे झाले असते, दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आम्ही बंड केल्यानंतर काय होईल, काय होईल, असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. पण लढाई अवघड असली तरी आम्ही त्यात यशस्वी झालो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले
पद्मावती मंदिरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना, बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे सांगतानाच लोकांचा आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले, असे शिंदे म्हणाले. तसेच मी माझी मूळे विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मूळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आले आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा येथील दरे या आपल्या गावी सहकुटुंब आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेतले. त्यानंतर ते तापोळा येथे आले होते.